Vidysea Logo

Actress Swaroop Sampat Reveal About Her Education Journey In Interview On Teachers Day

‘‘मी निर्भय शिक्षिका आहे, वेगवेगळे प्रयोग करायला, त्यातला धोका पत्करायला मला आवडतं. गेल्या २५ वर्षांच्या शिक्षक म्हणून केलेल्या कामावरून मी इतकं तर म्हणूच शकते स्वत:बद्दल! कारण या वर्षांत थोड्याथोडक्या नाही तर हजारो मुलांना मी शिकवलंच, पण किमान साडेतीन लाख शिक्षकांना शिकवलंय.

Woman looking front

Team Vidysea

September 8, 2025

Actress Swaroop Sampat Reveal About Her Education Journey In Interview On Teachers Day

वयाच्या अडतिसाव्या वर्षी ‘शिकवणं’ हा त्यांना इतरांसह आपले आयुष्य घडविण्याचा मार्ग म्हणून गवसला. गेले पाव शतक त्या भारतभरातील खेडेशाळांपासून ते उच्चभ्रू शिक्षणसंस्थांपर्यंत आणि बालवाडी ते महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षकांना मूल्यसंस्कारांचे धडे देत आहेत. शिक्षकांनी नवीन तंत्रपद्धती आत्मसात करून घ्याव्यात यासाठी देशभरातल्या सुमारे साडेतीन लाख शिक्षकांना त्यांनी प्रत्यक्षअप्रत्यक्ष शिकवले आहे. विशेष म्हणजे यासाठी त्या मोबदला घेत नाहीत. त्या आहेत नाट्याच्या माध्यमातून जीवनकौशल्य रुजविण्यात हातखंडा असलेल्या डॉ. स्वरूप संपत रावल. त्यांच्यातल्या शिक्षिकेचे दर्शन घडवणारी ही मुलाखत कालच्या (५ सप्टेंबर) शिक्षक दिनानिमित्ताने…

‘‘मी निर्भय शिक्षिका आहे, वेगवेगळे प्रयोग करायला, त्यातला धोका पत्करायला मला आवडतं. गेल्या २५ वर्षांच्या शिक्षक म्हणून केलेल्या कामावरून मी इतकं तर म्हणूच शकते स्वत:बद्दल! कारण या वर्षांत थोड्याथोडक्या नाही तर हजारो मुलांना मी शिकवलंच, पण किमान साडेतीन लाख शिक्षकांना शिकवलंय. शिवाय कित्येकांना ऑनलाइन तर कित्येकांना माझ्या पुस्तकांच्या, भाषणांच्या माध्यमांतून. मी भारतभर गेले आहे. अगदी लहान लहान गावात, खेड्यात.

महाराष्ट्रात नंदुरबारमधील एका गावात जायला तर मला आठ ते दहा तास लागले होते. पण मी गेले आणि ४०० मुलांना शाळेत परत आणण्यात आम्ही यशस्वी ठरलो. आहे की नाही मजा! मला धमाल करत शिकवायला आवडतं. आणि तेच मी मुलांकडून करून घेते. मग का नाही येणार मुलं शाळेत? आपली आताची शिकवण्याची पद्धत पूर्णत: बदलून टाकणं गरजेचं आहे, असं मला मनापासून वाटतं. मुलांना जीवनकौशल्यं शिकवणं आणि तेही नाट्याच्या माध्यमातून… ऐकायला विचित्र वाटू शकेल, परंतु मी ते सिद्ध करून दाखवलं आहे.’’ हे सांगणाऱ्या आहेत, इंग्लंडच्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ वूस्टर’ (Worcester) मधून पीएच.डी. प्राप्त केलेल्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. स्वरूप संपत रावल.

अनेकांना स्वरूप संपत म्हटलं की आधी आठवेल ते शफी इनामदार यांच्याबरोबरची ‘ए जो है जिंदगी’ या मालिकेतील धमाल रेणू. ‘नरम गरम’, ‘नाखुदा’, ‘साथिया’, ‘की अॅन्ड का’, ‘उरी’ सारखे त्यांचे काही चित्रपट. पण त्याही आधीच्या त्यांच्या भूतकाळात डोकावलं तर थेट जाता येईल ते त्यांना मिळालेल्या १९७९च्या ‘मिस इंडिया क्राऊन’कडे. दिसायला मोहक, सुंदर, शिडशिडीत बांध्याच्या स्वरूप काही काळ नाटकांत, चित्रपटांत रमल्याही. पण दरम्यान लग्न झालं ते नाटकांतून चित्रपटांत नाव कमवलेल्या परेश रावल यांच्याशी. मग काय, लग्न, दोन मुलं (अनिरुद्ध, आदित्य), त्यांचा अभ्यास यात स्वरूपबाई रमून गेल्या.

रोमँटिक कादंबऱ्या उशाशी ठेवत आयुष्य घालवायला लागल्या. ती पुस्तकं बघून एके दिवशी परेश म्हणाले, ‘हे तुझं आयुष्य आहे का?’ या वाक्यांनी जणू त्यांना गदागदा हलवून जागं केलं. आणि मग बंद करून ठेवलेल्या भूतकाळाचं पुस्तक त्यांनी उघडलं. ते पुस्तक जाऊन उघडलं ते थेट बी.ए.च्या अंतिम परीक्षेपाशी. त्या वर्षी इतर विषयांचे पेपर त्यांनी सोडवले होते. पण जेव्हा इंग्रजी लिटरेचर अर्थात साहित्याचा पेपर द्यायचा होता त्या दिवशी प्रश्नपत्रिका हातात घेतली आणि त्यांच्या लक्षात आलं, ‘हे सारं काही येतंय आपल्याला. तेच काय पुन्हा लिहायचं? हाऊ बोअरिंग?’ त्यांनी उत्तरपत्रिकेवर स्वत:चं नाव टाकलं आणि पेपर तसाच देऊन सरळ निघून आल्या. घऱी आल्यावर हे जेव्हा आईला सांगितलं तेव्हा चांगलाच दम बसला कारण आई, डॉ. मृदुला संपत स्वत: डॉक्टर. यशस्वी कर्करोगतज्ज्ञ, आणि वडील बच्चुभाई संपत नाट्य क्षेत्रातले मोठे कलाकार. पण तेवढ्यात ‘मिस इंडिया’ प्रकरण त्यांच्या आयुष्यात आलं.आणि त्या ‘मिस इंडिया’ झाल्याही. आणि मग काय, परंपरेप्रमाणे चित्रपट,मालिका, संसार, मुलं यातच दिवस जायला लागले होते…

डॉ. स्वरूप यांनी १२ पुस्तकं लिहिली असून ७५ पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांत शिक्षणविषयक भाषणे दिली आहेत. तसंच१५ हून अधिक जर्नलमध्ये लेखही लिहिले आहेत. त्यांचा पीएच.डी. प्रबंध इंटरनेटवर उपलब्धअसून अनेकांनी त्यांच्या संशोधन लेखनात त्याचे संदर्भ दिले आहेत.

… पण आता त्यांना मिटलेलं आयुष्याचं पुस्तक नव्यानं लिहायला घ्यायचं होतं… इंग्रजी साहित्य हा त्यांचा आवडीचा विषय असल्यानं एम.ए.ही केलं. मधल्या काळात मुलांच्या शाळेत शिक्षक-पालक बैठकांना त्यांनाच जावं लागे. मुलांच्या शिक्षणाची पद्धत त्या बघत होत्याच. काही तरी बदलायला हवं हे जाणवत होतं. दरम्यान, आणखी एक महत्त्वाची घटना घडली. मुलांच्या शाळेतल्या एका सातवीतल्या मुलीनं कमी गुण मिळाले म्हणून आत्महत्या केली. त्या घटनेनं त्या मुलांच्या मनाचा आणि शिक्षण पद्धतीचा अधिकच खोल जाऊन विचार करायला लागल्या.

त्यातच आणखी एक घटना घडली ती म्हणजे, मुलांच्या शाळेत मूक-बधिर मुलांना शिकवण्यासाठी प्रशिक्षण वर्ग सुरू झाले होते. पालक-शिक्षक गटाच्या अध्यक्ष या नात्याने त्यांनी ते शिकून घेतलं. आणि खऱ्या अर्थाने त्यांना आपल्या जगण्याची वाट सापडली. त्यांनी त्या दोन्ही घटनांची सांगड घातली आणि आपल्या पीएच.डी.चा विषय निवडला, ‘द रोल ऑफ ड्रामा इन एन्हान्सिंग लाइफ स्किल्स इन चिल्ड्रन विथ लर्निंग डिसएबिलिटी.’

तेव्हा त्यांचं वय होतं ३८. दोन्ही मुलं मार्गी लागलेली, परेश रावल यांची चित्रपट कारकीर्द तेजीत होती. म्हटलं तर सुखासीन आयुष्य यथोचित सुरू होतं. पण आता त्यांना शिक्षणाचं क्षेत्र खुणावत होतं. पीएच.डी.साठी केलेल्या संशोधनातून त्यांना शिक्षणाचं गमक कळलं होतं. आणि त्यांनी आयुष्याचा नवा अध्याय लिहायला घेतला… सगळ्या शिक्षणमंत्र्यांना, शिक्षण अधिकाऱ्यांना, सचिवांना, अनेक राज्यातल्या शिक्षण मंडळांना सगळ्यांना पत्रं लिहिली, ‘मी शिकण्याची नवीन पद्धत शिकून आले आहे.

जेव्हा मी शिकवण्याची माझी इच्छा जाहीर केली तेव्हा परेशने स्पष्ट सांगितलं, शिक्षणासाठी कुणाकडूनही तू पैसे घेऊ नकोस, आपल्याकडे भरपूर आहेत. इतकंच नाही तर माझी भाषणं, माझं संशोधन लेखन, इंटरनेटवरील माझं लिखाण पूर्णत: कॉपी राइट फ्री करायला सांगितलं. त्यामुळे जे जे मी आत्तापर्यंत शिकले आहे त्याचा सगळ्यांनी फायदा घ्यावा असं मला वाटतं. तुमच्या शाळेत, महाविद्यालयात, संस्थांमध्ये मला बोलवा. मी यायला तयार आहे, असं मी सर्वांना सांगत असते.

आणि मला ती शिकवायची आहे. मला संधी द्या.’ कुणीही त्याला उत्तर दिलं नाही. पण एक संधी चालून आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते. गुजरात येथे ‘बाल विद्यापीठ’ सुरू करायचं आहे, अशी एक जाहिरात वृत्तपत्रात आलेली स्वरूप यांनी पाहिली. त्यांनी मुख्यमंत्री विभागाला लिहिलं. प्रतिसाद मिळाला. त्या थेट गुजरातला पोहोचल्या. मुलांना नव्हे शिक्षकांना शिकवायचं आहे, ही संकल्पना त्यांनी मुख्यमंत्री मोदींना सांगितली आणि मान्यही झाली. त्यानंतर ‘सेव्ह द चिल्ड्रन’, ‘युनिसेफ’बरोबरही त्यांनी काम केलं.

ड्रामा अर्थात नाट्याच्या माध्यमातून त्यांनी शिक्षकांना शिकवायला सुरुवात केली. आणि मग तो सिलसिला चालूच राहिला… तो अगदी आत्तापर्यंत. त्यांनी सर्वाधिक शिकवलं ते महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये. याशिवाय अगदी उरीपासून झारखंड, उत्तर प्रदेश, मदुराई, कर्नाटक, पुदुच्चेरी (पॉन्डेचरी) अनेक राज्यांत त्यांनी शिक्षणकार्यशाळा घेतल्या आहेत.

डॉ. स्वरूप सांगतात, ‘‘मुलांमधील बदल माझ्यासाठी प्रेरणास्राोत आहे. जेव्हा मी मुलांना शिकवते आणि मला दिसतं की, त्यांना आधी जे समजलेलं नाही ते अचानक समजलं आहे, किंवा जे इतर शिक्षकांना समजवता आलं नाही, ते समजलं आहे, ते माझ्यासाठी प्रेरणादायी असतं. एक उदाहरण देते. गांधीनगरमध्ये, मी आठवीतल्या मुलांना संस्कृत स्तोत्र ‘आदित्यहृदयम्’ शिकवत होते. ते शिकले. मी जसं त्यांना शिकवलं, अगदी तसं. मुलांना त्यांच्या मातृभाषेतल्या कविता शिकवणं तिथल्या शिक्षकांना कठीण झालं होतं असं नंतर तिथले मुख्याध्यापक मला म्हणाले. असं काही झालं की खरोखरीच शिकवण्याची माझी इच्छा तीव्र होते.

मला माहिती आहे की, मी मुलांमध्ये बदल करू शकते. मला शिकवणं चालूच ठेवायचं आहे, याला आणखी एक कारण म्हणजे मी शिक्षकांना अधिक चांगले शिक्षक बनताना, त्यांच्या क्षेत्रात प्रगती करताना पाहते, तेव्हा मला आनंद होतो. मला वाटतं, शिक्षण म्हणजे जीवनासाठीची तयारी नाही, तेच खरं जीवन आहे.’’ शिक्षणाची ही व्याख्या उलगडताना त्या सांगतात, ‘‘लाइफ स्किल म्हणजेच जीवनकौशल्यं. ती आजच्या काळासाठी अतिशय महत्त्वाची आहेत. आत्तापर्यंतचं आपलं शिक्षण बहुतांशी घोका, रट्टा मारा प्रकारचं जास्त आहे.

‘हे करा, ते करू नका’ असं आपणच सांगायचं आणि मग दुसरं काही सुचत नाही का? असं आपणच मुलांवर ओरडायचं. मला वाटतं, अगदी बालवाडीपासून मुलांना विचार करायला शिकवलं पाहिजे. ‘क्रिएटिव्ह’ आणि ‘क्रिटिकल थिंकिंग’ मुलांना समजलं की त्यांच्या आयुष्यातले प्रश्न तेच सोडवतील. माझ्या दृष्टीने जीवनकौशल्य म्हणजे निर्णयक्षमता, भावनांचे व्यवस्थापन, संभाषण कौशल्य, सर्जक विचारक्षमता,आणि समानुभूती (एम्पथी)… ते कलेच्या माध्यमातून (आर्ट इन्टिग्रेटेड) शिकवण्याकडे माझा भर असतो.’’ त्या सांगत राहातात. आणि गेल्या २५ वर्षांतील त्यांचे एकेक अनुभव आपल्यासमोर उभे राहतात…

‘‘महाराष्ट्रातील उस्मानाबाद (धाराशिव), लातूर, अमरावती, गडचिरोली, नंदुरबार अशा दहा जिल्ह्यांतल्या दुर्गम ठिकाणच्या शिक्षकांना मी शिकवलं आहे. अमरावतीच्या एका मुलाची आठवण सांगते. तो शाळेत यायचा तो फक्त दुपारी शाळेत जेवण मिळतं म्हणून. बाकीचा दिवस तो बकरी चरायला नेत असे. शिक्षक सांगून थकले परंतु तो अजिबात ऐकत नव्हता. एकदा माझा वर्ग सुरू होता. मी मुलांना नाटक, खेळ, नृत्य करत टाळ्या वाजवत शिकवत होते. मुलं रंगून गेली होती. शिक्षकांसाठीसुद्धा ही शिकवण्याची पद्धत नवीन होती. तो मुलगाही रमला आणि शाळेत यायला लागला.

‘एक्सपरिएन्शियल’ वा अनुभवातून मिळणारं ज्ञान हे मला मोलाचं वाटतं. गुजरातमधल्या लवाडच्या शाळेतला एक अनुभव. मुलं ब्लॉक प्रिंटिंग शिकत होती. कापडावर एक ठसा उमटवायचा. तो वाळल्यावर दुसरा. थांबणं भाग असतं, त्यासाठी लागणारा संयम शिकण्यासाठी दुसरा चांगला मार्ग कोणता? किंवा फोटोग्राफी. योग्य प्रकाश आणि हवी तशी फ्रेम मिळण्यासाठी थांबणं हे पेशन्सचंच तर उदाहरण आहे. भारतात वेगवेगळ्या राज्यांत २५०० पेक्षा जास्त कला- चित्रकला,नक्षीकाम, हस्तकला आहेत. चित्रांत जसं मधुबनी, वारली चित्रकला आहे, शिवणात कच्छी काम, काचकाम असे अनेक प्रकार आहेत. त्याशिवाय आम्ही मुलांना शेती काम शिकवतो, मातीकाम, लाकूडकाम, शिवणकाम या सगळ्या गोष्टींचा मुलांचा लहानपणापासूनच परिचय व्हायला हवा.

आपल्याकडे नववीनंतर मुलांना ‘व्होकेशनल’ अर्थात व्यावसायिक शिक्षण दिलं जाण्याची तरतूद आहे. पण मला वाटतं, ते सातवी आठवीपासूनच द्यायला हवं. आपल्याला काय आवडतं. आणि कशात करिअर करायला आवडेल हे आधीच्या इयत्तांमध्येच कळलं तर? चित्रपट हे एकच माध्यम घेतलं तरी त्यातले किमान १०० वेगवेगळे व्यवसाय करता येतात, हे मुलांनाच कळलं ते आम्ही घेतलेल्या एका फिल्म मेकिंग वर्कशॉपमधून. अगदी विज्ञानही आपण मुलांना यातून शिकवू शकतो. शिवाय कलेचा आस्वादही मुलं यातूनच पूर्णत्वाने घेऊ शकतील. आपल्या शास्त्रीय संगीतात वेगवेगळे राग आहेत.

एका शाळेत आम्ही प्रयोग केला त्यावेळी मुलांना पाऊस कसा पडतो हे शिकवताना तबला वादनाचे, संतूर वादनाचे काही तुकडे, राग मेघमल्हार, पुरिया धनश्री याचे काही तुकडे ऐकवले. त्यावर मुलांनी नृत्य केलं. मला नाही वाटत ते कधी आयुष्यात विसरतील की पाऊस कसा पडतो ते. हेच ‘होलिस्टिक एज्युकेशन’ आहे. जे पूर्वी प्राचीन काळी आपल्याकडे होतं. नंतर ब्रिटिशांच्या वसाहत काळानंतर त्याला उतरती कळा लागली. आज पुन्हा या सगळ्याला एकत्र एकत्र आणायची गरज आहे. त्याचा समावेश ‘नॅशनल एज्युकेशन पॉलिसी’ अर्थात ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ मध्ये आहे.

आपल्या मुलांसाठी हे सर्वोत्कृष्ट धोरण आहे असं माझं मत आहे. माझाही हातभार त्याला लागलेला आहे. आमच्या गटाने मुलांसाठी विषय कशा प्रकारचे असावेत, अभ्यासक्रम, परीक्षा कशी असावी याचे अहवाल दिले. या एकूण प्रक्रियेत खूप अभ्यासक सहभागी आहेत. ‘राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद’ (एनसीईआरटी)च्या माध्यमातून दिलं जाणारं शिक्षण हे सर्वसमावेशक आहे. यातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दरवर्षी मुलांसाठीची १० दिवसांची ‘बॅगलेस स्कूल.’ यात मुलांना शाळेत यायचं नाही उलट मुलं वेगवगळ्या छोट्या छोट्या उद्योगांना भेटी देतील, विविध कला शिकतील, स्थानिक कलाकारांच्या भेटी घेतील. त्यांना उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये नेलं जाईल.

मला आठवतंय, आम्ही एकदा गुजरातमधल्या मुलांना घेऊन ‘राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटी’मध्ये गेलो होतो. मुलांना ती वास्तू बघूनच इथे शिकायला यायला पाहिजे असं वाटू लागलं. इतकंच नाही तर तिथल्या ‘फोरेन्सिक लॅब्रोटरी’मध्ये अगदी हाताचे ठसे ओळखण्यापासून ‘डीएनए’पर्यंतच्या अनेक गोष्टींचा मुलांनी इतका आनंद घेतला जो त्यांना पुस्तकातून शिकवून कधीच मिळाला नसता.’’

‘‘शासनाच्या शिक्षण धोरणातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे तो ‘नॅशनल मिशन ऑफ मेन्टॉरिंग’ (एनएमएम).‘नॅशनल कॉन्सिल फॉर टीचर एज्युकेशन’च्या अंतर्गत हा उपक्रम राबविला जात आहे. सर्व शिक्षकांना त्यातून मार्गदर्शन घेता येणार आहे. भारतात शासनाचे ७९ लाख शिक्षक आहेत. त्यातील फक्त ६० शिक्षकांची या ‘मेन्टॉरिंग’साठी निवड झाली आहे. त्यातल्या अशासकीय शिक्षक म्हणून मी आणि आणखी एक दोघं आहोत, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मुलांना नुसतं समोर बसून आम्ही शिकवतोय. तुम्ही शिका ही पद्धत बदलून, त्यांना सहभागी करून शिकवणं गरजेचं आहे असं मला वाटतं.

जेव्हा मी पीएच. डी. मिळवली तेव्हा मानसिक ताण असलेली मुले सातात एक होती. आज चार मध्ये एक सापडतात. मी जे जीवनकौशल्य म्हणते ते हेच आहे. ते मुलांना मिळायला हवं. त्यांना स्वत:चे निर्णय घेता येणं, कठीण काळात परिस्थिती हाताळणं, यायला हवं. मात्र हे आधी शिक्षकांनी शिकायला हवं. मी दोन उदाहरणं सांगते, गेली २५ वर्षं मी शिकवते आहे. बहुतांशी शिक्षकांना. अशाच एका शिक्षिकेचा मला अलीकडे फोन आला. म्हणाली,‘‘माझे वडील हृदयविकाराने रुग्णालयात दाखल झालेत. भाऊ बुद्धीने मंद असल्याने त्याचा उपयोग नाही.

घरची सगळी जबाबदारी माझ्यावर आली. एके दिवशी तर इतकी वाईट अवस्था आली की, आपला काही उपयोग नाही असं वाटून मी गावातल्या पानवाल्याच्या दुकानात जाऊन ब्लेड विकत घेतलं. घरी आले. ब्लेड उघडलं आणि तुमची आठवण आली. तुम्ही जे जे शिकवलं ते आठवलं आणि वाटलं, मी मेल्याने प्रश्न संपणार नाहीच उलट ते वाढतील. मी जिवंत राहिले तरच काही तरी करू शकेन. आणि मी ते ब्लेड टाकून दिलं.’’ अशीच दुसरी शिक्षिका तिने तर दुपट्टा पंख्याला टांगलाही होता.

पण मी शिकवलेलं आठवून ती खाली उतरली. म्हणाली, ‘‘मी खूप रडले, मोकळी झाले. पण स्वत:ला मारलं नाही.’’ आपण सगळी हाडामांसाची माणसं आहोत, गुण-अवगुण सगळ्यांकडेच असतात. संकटावर मात करण्याची वृत्ती, इच्छाशक्ती, चिकाटी, धाडस आदी गुण आपल्यात असतात. फक्त काहीवेळा ते दाखवून द्यावे लागतात. त्याने फरक पडतो. मी ते केलं. चांगल्या शिक्षकाचं हेच तर काम असतं!’’

Read the full article here: https://tinyurl.com/yc83va48

Vidysea

Got dreams to achieve? Hop on as
we take you on your journey to success!

Contact Info

    Phone Icon

    +91 7428715522

    Phone Icon

    support@vidysea.com

social iconsocial iconsocial iconsocial iconsocial icon